Ad will apear here
Next
‘मिस यू मिस्टर : आजच्या पिढीच्या नात्यांची कथा’

मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर अभिनित ‘मिस यू मिस्टर’ हा मराठी चित्रपट २८ जून २०१९ रोजी प्रदर्शित होतो आहे. समीर जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून, ओंकार रेगे या तरुण लेखकाने सहलेखक, सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल ओंकार रेगेशी साधलेला हा संवाद .....
..........
ओंकार रेगे
‘‘आपली पार्टनरशिप आहे ना, सेंच्युरी मारायची आहे ना,’ असे विचारणारी कावेरी कामानिमित्त परदेशी गेलेल्या तिच्या नवऱ्याला, वरुणला मिस करत असते. दूर राहिल्यामुळे नकळत निर्माण झालेला तणाव, नात्यातले अंतर, आपल्या नात्याबद्दलचा त्यांचा विचार, परस्पर संवाद आदी गोष्टी ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटातून पुढे येतात....’ ओंकार रेगे सांगत होता... त्याने या चित्रपटाचे सहलेखन केले आहे. 

यात वरुण आणि कावेरी ही मुख्य पात्रे आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा सहलेखक म्हणून ओंकार रेगेने जबाबदारी निभावली असून, त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. आपल्यासाठी हा अनुभव खूप भन्नाट होता, असे तो सांगतो. त्या निमित्ताने, ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने ओंकार रेगेशी संवाद साधला.


या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी त्याने सांगितल्या. ‘मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची या व्यक्तिरेखांसाठी झालेली निवड अगदी योग्य आहे. या चित्रपटातील वरुण आणि कावेरी ज्या वयाचे आहेत, त्याच वयाचे ते आहेत. नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करतात. नातेसंबंधातील चढ-उतार, आव्हाने या गोष्टी त्यांना सहजपणे समजू शकल्या. मृण्मयी आणि सिद्धार्थ दहा वर्षांनी एकत्र काम करत आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एकत्र एकांकिकांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री चांगली जमली आहे. त्यांच्यासाठी संवाद, प्रसंग लिहिताना खूप मजा आली. यात दोघांचे आई-वडील, नातेवाईक अशी इतरही पात्रे आहेत. राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर यांनी या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नव्या-जुन्या पिढीच्या विचारातील फरक, एकमेकांबद्दलचे प्रेम, सासू-सासरे आणि सून, आई-वडील आणि मुलगी, त्यांचे नाते, त्यांच्यातील संवाद आणि प्रसंग लिहिणे हा अनुभव आनंददायी होता. संपूर्ण कुटुंबाची गोष्ट यात आहे. यात आसू आणि हसू दोन्ही आहे. त्यामुळे हा चित्रपट कुटुंबासह बघावा असा आहे,’ असे ओंकारने सांगितले.  


समीर जोशीया चित्रपटातील जोडपे नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांची भाषा, नात्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन विचारात घेता संवादलेखनाचा विचार कोणत्या पद्धतीने करण्यात आला, असे विचारल्यावर ओंकार म्हणाला, ‘चित्रपटाचे मुख्य लेखक समीर जोशी आहेत. त्यांनीच याचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांना त्यांच्या लिखाणात आणखी काही तरी नवीन हवे होते. आजच्या काळातील जोडप्यांतील संवाद हे फोनवर किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे ती भाषा, संवादातील शॉर्टकट्स, तसेच विषयातील वेगळेपण अधोरेखित करणारे संवाद लिहिण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. इथे मला ओढून ताणून काही आणायचे नव्हते. आजच्या पिढीची संवादाची भाषा मला चांगली येते. त्यामुळे विशेष काही प्रयत्न घ्यावे लागले नाहीत. हे आधुनिक काळातील जोडपे आहे. त्यामुळे त्यांच्या संवादाची भाषा आजची आहे. त्यात इंग्रजी, हिंदी, मराठी अशा सगळ्या भाषांचा समावेश आहे. या चित्रपटात आधीच्या पिढीतील व्यक्तिरेखाही आहेत. नव्या आणि जुन्या पिढीतील संवाद, त्यांच्यातील नातेसंबंध या अनुषंगाने संवाद, प्रसंग लेखन आवश्यक होते. ते उत्तम करण्याचा मी प्रयत्न केला आहे.’

 चित्रपटासाठी लेखन करण्याचा ओंकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘याआधी मी एकांकिका, नाटके लिहिली आहेत. दिग्दर्शनही केले आहे. टीव्ही मालिकेसाठीही लेखन केले आहे; पण चित्रपटासाठी मी प्रथमच लेखन केले. यातील पात्रे, त्या भूमिका साकारणारे कलाकार हे लक्षात घेऊन लेखन करावे लागते. वेळेची कसरत करावी लागते. अनेक बारकावे मला जवळून अभ्यासता आले. दिग्दर्शनात सहायक म्हणूनही मी काम केले; पण अर्थातच पहिले प्राधान्य लेखनाला होते. संपूर्ण चित्रपट घडत असताना माझा त्यात सक्रिय सहभाग होता. त्यामुळे चित्रपटनिर्मितीची प्रक्रियाही जवळून अनुभवता आली. माझे अनुभवविश्व अधिक समृद्ध झाले.’ 

याआधी पुरुषोत्तम करंडक, अन्य एकांकिका स्पर्धांसाठी ओंकारने काम केले होते. तिथून चित्रपटापर्यंतचा प्रवास कसा होता, असे विचारले असता, ओंकारने पहिल्या अपयशापासूनचे सगळे अनुभव सांगितले. ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी मी नाटक लिहिले नाही; पण आमच्या कॉलेजतर्फे त्या स्पर्धेसाठी नाटक बसवताना मी त्या प्रक्रियेत सहभागी असायचो. एका वर्षी पुरुषोत्तम करंडकासाठी आमच्या कॉलेजने केलेल्या एका नाटकात माझी छोटीशी भूमिका होती; पण पहिल्याच वाक्याला अडखळलो आणि आमचे नाटकही पडले. त्या सगळ्या अपयशाचे खापर माझ्यावर आणि सगळ्या टीमवर फुटले. त्यानंतर मी सकाळ करंडक, सवाई करंडक, राम गणेश गडकरी करंडक या स्पर्धांसाठी नाटके लिहिली आणि त्यांना काही ना काही बक्षिसेही मिळाली. ‘वेटिंग फॉर सुपरमॅन’ या चित्रपट एकांकिकेला प्रतिलिपी या ब्लॉगतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज करंडक’ स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आहे. आजही ही एकांकिका स्पर्धांसाठी उत्तम मानली जाते. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या सगळ्याचा मी अनुभव घेतला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सहा वर्षे नोकरी केली. त्यादरम्यानही लेखन सुरू होतेच. त्यानंतर गेल्या वर्षी नोकरी सोडून मी पूर्णपणे या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला. नाटक, एकांकिका यांसह मालिकांसाठी लेखन केले आणि त्याचदरम्यान मला हा चित्रपट लिहिण्याची संधी मिळाली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अपयशाचा फटका खाऊन सुरू झालेला माझा प्रवास अशा प्रकारे चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे. अजून खूप शिकायचे बाकी आहे,’ असे तो म्हणाला.
‘कला क्षेत्रात नवीन पिढीला भरपूर संधी आहे; मात्र त्यासाठी मेहनतीची गरज आहे,’ असे ओंकारने आवर्जून सांगितले. ‘केवळ ‘मी हे करू शकेन’ असे वाटल्याने या क्षेत्रात उतरून उपयोग नाही. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, कोणतेही क्षेत्र असो, अभ्यास आवश्यक आहे. उत्तम लेखन करायचे असेल, तर वाचन केले पाहिजे. तुमचा अभ्यास चांगला असेल तर, तुम्ही उत्तम काम करू शकता आणि तुमची दखल घेतली जाऊ शकते. गुणग्राहक माणसे खूप आहेत. कुणाला ती लवकर भेटतात; कुणाला उशिरा इतकंच; पण गुणवत्ता असलेल्या कलाकाराला चांगल्या संधी उपलब्ध आहेत हे नक्की,’ असे अनुभवाचे बोल ओंकारने सांगितले.

‘सध्या मी एक नाटक लिहीत आहे. त्याशिवाय एका वेबसीरिजसाठी, तसेच चित्रपट, मालिका यांसाठी लेखनाबाबत चर्चा सुरू आहेत. लवकरच चांगले काहीतरी रसिकांपर्यंत घेऊन येईन,’ असे ओंकारने नमूद केले. 


BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(ओंकार रेगे याच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZHRCB
Similar Posts
१८ वर्षांच्या चिन्मयने लिहिलेले उत्तम नाटक - संगीत चंद्रप्रिया ‘संगीत चंद्रप्रिया’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, ते चिन्मय किरण मोघे या अवघ्या १८ वर्षांच्या प्रतिभासंपन्न तरुणाने लिहिले आहे. सर्वार्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या या नाटकाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती
आर्ट मंडी : समाजात मिसळणारी कलाचळवळ पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईत गेली तीन वर्षे २६ जानेवारी रोजी आर्ट मंडी या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. मंडईत भाजीखरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना चित्रे, शिल्पेही पाहता आणि खरेदी करता यावीत, समकालीन कला समाजापर्यंत पोहोचावी, हा या प्रयोगामागचा उद्देश आहे. ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज त्या अनोख्या प्रयोगाबद्दल
'इंटरनॅशनल फॅशन शो' साठी पुण्याच्या रोहित शिंदेची निवड पुणे : फिलिपीन्स येथे २४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल फॅशन शोसाठी जगभरातून जवळपास तीस देशांतून मॉडेल्स सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी भारतातून पुण्यातील रोहित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language